कोल्हापूर : ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी सांगवडेवाडी (ता. करवीर) सांगवडेवाडी ग्रामपंचायतीने एक भावनिक आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये विद्या मंदिर सांगवडेवाडी येथे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा राहत्या घराचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे गावातील पालकांना मोठा दिलासा मिळणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे वळावे, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण शाळा टिकून राहाव्यात, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी माध्यमाच्या ओढीत अनेक ठिकाणी ग्रामीण शाळांची पटसंख्या घटताना दिसत असताना सांगवडेवाडी ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल शिक्षणप्रेमींसाठी आशेचा किरण ठरत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासात शिक्षण हेच खरे भांडवल असल्याचा संदेश या निर्णयातून अधोरेखित होत आहे.
या उपक्रमामुळे पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचे लोकाभिमुख निर्णय घेतल्यास जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी मिळू शकते, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.



