सिंधुदुर्ग: सर्व मतदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे जाऊन मतदार यादीतील आपले नाव सन 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग (जुळवणी) झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
तसेच, आपल्या घरातील इतर सर्व मतदारांची नावेही योग्यरीत्या मॅपिंग झाली आहेत की नाही, याचीही खात्री करणे अत्यावश्यक आहे. जर एखाद्या मतदाराचे नाव मॅपिंग झालेले नसेल, तर ते नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे.
यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या तसेच कुटुंबातील सर्व मतदारांच्या नावांची तपासणी करून आवश्यक ती खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच, संबंधित बी.एल.ए. (बूथ लेव्हल एजंट) यांना देखील बी.एल.ओ. यांच्या सहकार्याने मॅपिंग प्रक्रियेत मदत करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या कोणत्याही मतदाराचे नाव चुकूनही वगळले जाणार नाही, याची काळजी घेता येईल.
सर्वांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले मतदानाचे हक्क सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



