सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या सावंतवाडी येथील एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे भव्य बसस्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना काळामुळे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पुन्हा गती घेऊ लागला आहे. सुमारे चार एकर जागेत ‘बीओटी’ तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, राज्यातील आदर्श बसस्थानक म्हणून सावंतवाडीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

या नव्या बसस्थानकात प्रवाशांसाठी अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रस्ते, बसच्या सुलभ हालचालीसाठी आवश्यक रुंदीकरण, तसेच सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासोबतच व्यावसायिक संधी निर्माण करून महसूलवाढीवरही भर दिला जाणार आहे.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सावंतवाडी तसेच वेंगुर्ला बसस्थानक परिसरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुनर्विकासाच्या आराखड्यात जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य जागेत येत असल्याने निर्माण झालेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला आहे. यासाठी विशेष बैठक घेऊन तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात कोणालाही विस्थापित न करता सर्वांच्या सहकार्याने काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
राज्याच्या परिवहन मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगत, पुढील दोन वर्षांत या प्रकल्पाचे भव्य स्वरूप प्रत्यक्षात येईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेलाही प्राधान्य देत असल्याचे सांगितले. शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक बसस्थानक आणि सक्षम आरोग्य सुविधा यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



