सावंतवाडी : शहरातील साईकृपा लॉजिंगमध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. नोवेल अल्बर्ट डिसोजा (रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) असे मृताचे नाव आहे.
डिसोजा हे मागील चार दिवसांपासून साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास होते. रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास लॉजिंगमधील सर्व्हिस बॉय साफसफाईसाठी त्यांच्या खोलीत गेला असता, ते कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यानंतर तत्काळ 108 ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास हवालदार सुरेश पाटील करीत आहेत.



