सावंतवाडीकरांना दिलेला शब्द पूर्ण करणारचं! : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची ग्वाही. ; ‘मे महिना फक्त माझ्या सावंतवाडीच्या नागरिकांसाठी’

सावंतवाडी : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मे महिन्यात प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. “लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणारच, विकास हाच आमचा ध्यास आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 प्रत्येक प्रभागात ‘एक दिवस नागरिकांसाठी’
मे महिन्यात नगराध्यक्षा स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार असून, त्यांच्या तक्रारी जागेवरच सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे प्रशासन थेट लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

 १५ मेपूर्वी रस्ते पुन्हा सुरळीत –
गॅस लाईनसाठी खणलेले रस्ते १५ मेपूर्वी पूर्णपणे दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार आहेत. सालईवाडा, सर्वोदयनगर ते मच्छी मार्केट परिसरातील काम पूर्ण झाले असून उर्वरित भागात काम वेगात सुरू आहे.

आरोग्य सेवांना प्राधान्य –
शहरवासीयांसाठी शववाहिका मोफत उपलब्ध.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांवर सकारात्मक भूमिका.
शवविच्छेदन विभाग दुरुस्ती आणि हायमास्ट बसविण्याचा निर्णय.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत बैठक पार.

मच्छी मार्केटमध्ये महिलांसाठी सुविधा –
मच्छी मार्केटमधील अडचणी दूर करून महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले जाणार आहे.

पावसाळ्यापूर्वी वीज नियोजन –
महावितरणसोबत बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीच वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.

“पाण्यावर राजकारण नको” – ठाम भूमिका.
पाणीटंचाई ही गंभीर समस्या असल्याचे मान्य करत नगराध्यक्षा म्हणाल्या,
“यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन उपाय शोधायला हवा.”
जुनी पाईपलाईन बदलून नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी देण्यावर भर दिला जात आहे.

वादळग्रस्त भागात तातडीची मदत –
अलीकडील वादळामुळे नुकसान झालेल्या २२ ठिकाणी टीम कार्यरत असून परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार दीपक केसरकर यांनीही पाहणी केली आहे.

दर्जेदार नळपाणी कामाची हमी –
पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी स्पष्ट केले की, फुटलेल्या जुन्या लाईनऐवजी पीव्हीसी पाईपचा वापर
नवीन लाईन अधिक दर्जेदार असेल, ढूळ व कमी दाबाच्या पाण्याच्या समस्या सोडवल्या
“कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड होणार नाही,” असा त्यांनी विश्वास दिला.

यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला सभापती दिलीप भालेकर, तसेच मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर आदी उपस्थित होते. एकूणच सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन समस्या सोडविण्याचा निर्धार करत विकासकामांना गती देण्याचे संकेत दिले आहेत. आता या घोषणांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles