जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! : पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा.

सावंतवाडी : तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची गंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास ६१ ठिकाणी मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून, “शासनाच्या निकषात बसवूनच नव्हे तर आवश्यक असेल तर चौकटीबाहेर जाऊनही जनतेला मदत करू,” असा ठाम शब्द त्यांनी दिला.


वादळग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि रामेश्वर प्लाझा येथे प्रत्यक्ष भेट देत नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
मंत्री राणे म्हणाले, “आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले आणि स्थानिक टीम जनतेच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शासनही जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे.”
दरम्यान, गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. “काही ठिकाणी गैरसमज झाले असतील, पण प्रशासनावर चुकीची छाप पडू देऊ नका. सर्व विभागांमध्ये समन्वय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज यंत्रणा –
पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटविणे, आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करणे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. महावितरणच्या कामातही मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले. भूमिगत वीजवाहिन्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती देत, टप्प्याटप्प्याने सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शक्तीपीठ’ महामार्गावर स्पष्ट भूमिका – 
शक्तीपीठ महामार्गाबाबत सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना राणे म्हणाले, “हा मार्ग जिल्ह्याच्या विकासासाठीच आहे. बांदा व इतर गावे बाधित होणार नाहीत. रेडी पोर्टशी जोडणारा नवा पर्याय तयार केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.”

आरोग्य विभागात मोठी भरती –
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे भरण्यास सुरुवात झाली असून, सावंतवाडीत एमडी फिजिशियनची नियुक्ती करण्यात आली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान आणखी भरती होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यात माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, प्राचार्य डी.एल.भारमल, सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, प्रतिक बांदेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संतोष गांवस, संतोष मठकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles