सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (दि. २६ एप्रिल २०२६) सकाळी ९.०० ते ११.३० या वेळेत आंबोली व आरोंदा परिसरात पोलिसांनी विशेष कारवाई करत गोवा बनावटीची दारू जप्त केली असून दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, तौसिफ ताजुद्दीन सौदागर (वय ३९, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) हा एसटी बसमधून प्रवास करत असताना त्याच्या पिशवीतून सुमारे १२,८०० रुपयांची गोवा बनावटीची व्होडका आढळून आली. आंबोली बसस्थानक येथे तपासणीदरम्यान ही दारू जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत, मागदेलीन अगस्तीन फर्नांडिस (वय ६४, रा. आरोंदा देऊळवाडी) याच्या ताब्यातून १,८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू विक्रीच्या उद्देशाने साठवलेली आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अरवारी हे करत आहेत.



