सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वैभववाडी तालुक्याचा दौरा करत प्रशासनाच्या विविध कामांचा सखोल आढावा घेतला. नगरपंचायत कामकाज, जनगणना प्रशिक्षण, ग्रामीण रुग्णालयाची पाहणी तसेच आंबा-काजू पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष क्षेत्रभेट अशा बहुआयामी उपक्रमांतून त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या.
दौऱ्याची सुरुवात वाभवे–वैभववाडी नगरपंचायत कार्यालयाच्या भेटीने झाली. शहरातील विकासकामे, उत्पन्नवाढीचे पर्याय, स्वच्छ सर्वेक्षण आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाची अंमलबजावणी याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यानंतर पंचायत समिती सभागृहात आयोजित जनगणना २०२७च्या घरगणना प्रशिक्षणाला भेट देत त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. “जनगणना प्रक्रिया अचूक, शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावी,” यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला. औषधसाठा, कर्मचारी उपलब्धता आणि रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची तपासणी करून “रुग्णांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळालेच पाहिजेत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
नाधवडे परिसरात शेतकरी निता कुपटे व राजेश तावडे यांच्या शेताला भेट देत आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचा पंचनामा प्रत्यक्ष पाहिला. पंचनामा प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पडावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कडक सूचना दिल्या.
या दौऱ्यावेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, कृषी अधिकारी निरंजन देशमुख, भूमी अभिलेख उपअधीक्षक सचिन गवारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन अधिक जबाबदार आणि कार्यक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची ही ‘ग्राउंड झिरो’ पाहणी महत्त्वपूर्ण ठरली आहे.



