मुंबई / कणकवली : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या यादीत कोकणातून माजी आमदार प्रमोद जठार यांना संधी देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर उत्साहाची लाट उसळली आहे. त्यांच्या सोबत संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांचीही नावे घोषित करण्यात आली आहेत.
कोकणातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह राणे समर्थकांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जठार यांच्या अनुभवी नेतृत्वाला आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीला पक्षाने पुन्हा एकदा संधी दिल्याचे मानले जात आहे.
सन २००९ मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी होत जठार यांनी आपल्या कार्यकाळात आनंदवाडी बंदर आणि वैभववाडी बस स्थानक यांसारखी महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली होती. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका विशेष चर्चेत राहिली होती.
२०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात झाला होता. मात्र आता विधान परिषदेच्या माध्यमातून जठार यांची पुन्हा एकदा राजकारणात दमदार पुनरागमनाची नांदी मानली जात आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना जठार म्हणाले, “पुढील सहा वर्षांत कोकणातील प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल.” तसेच त्यांनी ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
कोकणाच्या विकासासाठी अनुभवी नेतृत्वाला मिळालेली ही संधी आगामी काळात किती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



