– जुन्या आठवणींना उजाळा देत ‘दिशा फाउंडेशन’च्या माध्यमातून समाजासाठी एकत्र येण्याचा निर्धार!
सावंतवाडी : शाळेची घंटा, वर्गातील खोड्या, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि निरागस मैत्री… काळ पुढे सरकला, आयुष्याच्या वाटा बदलल्या; मात्र मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या शालेय आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्या त्या कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या “आठवणींची शाळा” या भावनिक पुनर्भेटीत. आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यात वर्गमित्र-मैत्रिणींनी अनेक वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मैत्रीच्या या सुंदर मिलनसोहळ्यात केवळ आठवणींची देवाणघेवाणच झाली नाही, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचाही महत्त्वपूर्ण संकल्प करण्यात आला. *“दिशा फाउंडेशन”*च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सहाय्य, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांनी आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, मनमोकळ्या गप्पा आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे वातावरण अक्षरशः भावनांनी ओथंबून गेले होते. अनेकांच्या डोळ्यांत जुन्या दिवसांच्या आठवणींनी आनंदाश्रूही दाटून आले.
“वर्ग बदलले, चेहरे बदलले, आयुष्य बदलले… पण मैत्रीचा धागा मात्र आजही तितकाच घट्ट आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातही अशाच प्रकारचे स्नेहमेळावे आणि सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या स्नेहमेळाव्यास १९९३-९४ बॅचमधील सतीश सावंत, दीपक राऊळ, अनिल राऊळ, प्रवीण कुडतरकर, सुभाष कुडतकर, महेश मडगावकर, विलास राऊळ, राजू गोवेकर, विष्णू राऊळ, महेश राऊळ, संतोष राऊळ, जयद्रथ राऊळ, दीपा नाईक, जुली अल्फान्सो, कलेशा म्हाडगुत, रजनी पास्ते, संगीता गावडे-शेडगे आदी वर्गमित्र-मैत्रिणी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.



