कुडाळ : येथील नवउद्योजकांना आपले नवीन उद्योग सुरु करण्यासाठी तसेच ज्या उद्योजकानां आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा असेल अशा सर्वाना युको बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदराने आणि तातडीने कर्ज पुरवठा करण्याचा आपला मानस असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी आपली बॅक कटिबद्ध असल्याचे युको बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर सिद्धार्थ दास यानी सांगितले. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या उद्योगवृध्दी कार्यक्रमात ते बोलत होते.

(फोटो ओळी – कुडाळ येथे युको बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ दास मार्गदर्शन करताना. सोबत डॉ. नितीन पावसकर, ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, कुणाल ओरोसकर व अन्य.)
आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरच्या गाव तेथे उद्योजक या संकल्पनेचे मुख्य समन्वयक डॉ. संतोष राणे या उद्योगवृध्दी वार्तालाप कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
युको बँकेच्या पणजी शाखेचे मुख्य प्रबंधक कुलभूषण दास यानी विविध उद्योगाना कशा प्रकारे अर्थसाहाय्य करता येईल त्याची सविस्तर माहिती दिली.उपस्थित असलेल्या अनेक उद्योजकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी कुडाळ एमआयडीआयसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सर्वश्री नितीन पावसकर, निलेश धडाम, कुणाल ओरोसकर, आनंद बांदिवडेकर, किशनलाल बिश्नोई, सौ.अमृता कदम, तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन नाईक, इंडिया बांबू फोरमचे शिल्पेश गंभीरे, उद्योजक सूरज तेंडुलकर, पी. के. परब, साईश मसके, गौरव पाटकर, भिवा परब, राहुल मानकर आदि उपस्थित होते.
आपल्या समारोपाच्या संबोधनात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरचे पब्लिक रिलेशन,प्रसारमाध्यमं आणि कम्युनिकेशन समितीचे को- चेअरमन व कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह ॲड. पार्सेकर यांनी ‘जसे शासनाने शासन आपल्या दारी त्याच धर्तीवर युको बॅक आपल्या दारी हा उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात उभारी देण्यासाठी सुरू केलेला अभिनव उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून आपल्या सर्व उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. असे सांगून युको बँकेचे अधिकारी आपल्या उद्योजकानां सहकार्य करत आहेत याबद्दल युको बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे ॲड. पार्सेकर यांनी आभार मानले.



