“कुंपणच शेत खाऊ लागलं तर…!” – सावंतवाडीच्या सुसंस्कृत परंपरेला ऑनलाईन मटक्याचा काळा डाग ! – ‘सत्यार्थ महाराष्ट्र’ विशेष संपादकीय

✍️ रुपेश पाटील.

आमच्या तळकोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले शहर म्हणजे ‘सावंतवाडी’. अत्यंत शांततेचा श्वास घेणारे, संस्कारांची शिदोरी जपणारे आणि सभ्यतेच्या सुवर्णरेषांनी नटलेले हे शहर!, एका बाजूला जगप्रसिद्ध लाकडी खेळणी, ऐतिहासिक राजवाड्याचा अभिमान, मोती तलावाच्या शांत पाण्यावर उमटणारे पर्यटनाचे प्रतिबिंब आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक-राजकीय क्षेत्रात राज्यभर ठसा उमटवणारी येथील मातब्बर व्यक्तिमत्त्वे… अशा या शहराचा लौकिक गुरुवार, 21 मे 2026 रोजी एका धक्कादायक प्रकारामुळे काळवंडला गेला.

पंचायत समितीच्या महत्त्वपूर्ण शासकीय बैठकीत एक जबाबदार अधिकारी चक्क ऑनलाईन मटक्याचे आकडे पाहत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत वाऱ्यासारखा पसरला आणि सावंतवाडीच्या सुसंस्कृत चेहऱ्यावर काळा शिंतोडाच उडाला. ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या वैयक्तिक चुकीपुरती मर्यादित नाही; तर ती प्रशासनातील वाढत्या बेफिकीरीची, नैतिक अधःपतनाची आणि जबाबदारी झुगारून ‘अधिकचा पैसा’ कमावण्याच्या हव्यासाची भयानक घंटा आहे.

ज्या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी… विकासाच्या योजनांचा रोडमॅप तयार व्हायला हवा… त्या ठिकाणी जर अधिकारी मटक्याचे आकडे तपासत असतील, तर हा प्रकार केवळ हास्यास्पद नाही, तर लोकशाहीच्या तोंडावरचा चपराक आहे.
कारण अधिकारी हा फक्त कर्मचारी नसतो; तो शासनाचा चेहरा असतो. जनतेच्या विश्वासाचा प्रतिनिधी असतो. आणि जेव्हा हाच प्रतिनिधी जुगाराच्या मोहात अडकलेला दिसतो, तेव्हा प्रशासनाच्या विश्वासार्हतेची राख उडते.

विशेष धक्कादायक बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने “होय, मी ऑनलाईन मटक्याचे आकडे पाहत होतो,” अशी कबुली दिली. हा त्याचा प्रामाणिकपणा म्हणायचा का निर्ढावलेपणा? कारण जर हीच प्रामाणिकता कर्तव्यपूर्तीत दिसली असती, तर जनतेने त्याला डोक्यावर घेतले असते. शासनाने “आदर्श अधिकारी” म्हणून गौरविले असते. पण दुर्दैवाने येथे प्रामाणिकपणा कर्तव्यात नव्हे, तर गैरप्रकार कबूल करण्यात दिसतो आहे!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी अनेकदा जाहीरपणे अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. कणकवलीतील जुगार अड्ड्यावर स्वतः धाड टाकून त्यांनी दिलेला संदेश अजून ताजा आहे. मग त्याच जिल्ह्यातील एक अधिकारी महत्त्वाच्या बैठकीत ऑनलाईन मटका पाहण्याचे धाडस करतो, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? आदेशांचा धाक उरलेला नाही का? की “आपलं कोण काय बिघडवणार?” अशी मानसिकता प्रशासनात बळावत चालली आहे?

आज प्रश्न फक्त त्या एका अधिकाऱ्याचा नाही. प्रश्न आहे संपूर्ण व्यवस्थेचा!
कारण कोणतीही संस्था ही एक “टीम” म्हणून काम करत असते. मग हा प्रकार एकट्याचा आहे की यामागे आणखी काही चेहरे आहेत? कार्यालयीन वेळेत, सरकारी बैठकीत आणि जबाबदारीच्या खुर्चीवर बसून जर ऑनलाईन मटका पाहिला जात असेल, तर त्या कार्यालयातील इतरांना त्याची कल्पना नव्हती का? की हा प्रकार इतका “सामान्य” झाला आहे की कुणालाच त्याचे गांभीर्य उरलेले नाही?

सावंतवाडीच्या इतिहासात असे प्रकार पूर्वी कधी घडले नाहीत. हे शहर संस्कारांनी मोठं झालं… प्रतिष्ठेने जगलं… आणि म्हणूनच ही घटना येथील सामाजिक वर्तुळात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे.
कारण सावंतवाडीची ओळख ही राजवाडा, मोती तलाव आणि खेळण्यांपुरती नाही; तर प्रामाणिकपणा, सामाजिक भान आणि नैतिक मूल्ये यांचीही आहे.

आज गरज आहे ती केवळ त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची नाही, तर संपूर्ण यंत्रणेचे आत्मपरीक्षण करण्याची!
कारण “कुंपणच शेत खाऊ लागलं,” तर शेतकऱ्याने न्याय कुणाकडे मागायचा?

हा प्रकार छोटा नाही… हा इशारा आहे!
प्रशासनातील वाढत्या अनास्थेचा… जबाबदारीच्या खुर्च्यांवर बसलेल्या लोकांच्या नैतिक घसरणीचा… आणि समाजासमोर चुकीचे आदर्श उभे राहण्याचा!

आता जनतेच्या मनात एकच प्रश्न घोंगावतो आहे —
“ज्यांच्या हातात व्यवस्था आहे, तेच जर व्यवस्थेला जुगाराच्या टेबलावर बसवत असतील… तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा तरी कुणावर?”

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles