सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञानाची दिशा देत, मायेची ऊब आणि शिस्तीची शिकवण देणाऱ्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. संप्रवी शंकर कशाळीकर यांच्या तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला शिक्षक दिनाच्या औचित्यावर भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या वतीने आयोजित सेवापूर्ती शुभेच्छा व सन्मान सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात हा भावस्पर्शी सोहळा उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सचिव गुरुवर्य व्ही. बी. नाईक होते.
यावेळी बोलताना गुरुवर्य व्ही. बी. नाईक यांनी सौ. कशाळीकर यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करताना म्हटले की, “सौ. कशाळीकर मॅडम यांनी आपल्या कार्यातून शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे. त्या मातृहृदयी, संवेदनशील, विद्यार्थीप्रिय आणि उत्तम शिक्षिका आहेत.”

दोडामार्ग परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांच्यावर आपुलकीची माया करणारी संवेदनशील आणि सजग शिक्षिका संस्थेला लाभली, ही संस्थेसाठी भूषणावह बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
३३ वर्षांचा ज्ञानयज्ञ; असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा
सौ. संप्रवी कशाळीकर या पूर्वाश्रमीच्या सौ. संगीता दिवाकर भागवत असून त्यांनी १९९३ मध्ये दोडामार्ग हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून सेवेला प्रारंभ केला. सलग ३३ वर्षे हिंदी विषयाचे प्रभावी अध्यापन करत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत.
अध्यापनाबरोबरच मातृतुल्य प्रेम, हसतमुख व्यक्तिमत्त्व, विद्यार्थीप्रियता, शिस्तप्रियता, कार्यतत्परता आणि सेवाभावी वृत्ती या गुणांमुळे त्यांनी विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
दोडामार्ग हायस्कूल तसेच परिसरातील माजी विद्यार्थी आजही त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. उत्तम नियोजन आणि कार्यतत्परतेसोबतच निवेदिका व सूत्रसंचालिका म्हणूनही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला, असे दोडामार्गचे सहाय्यक शिक्षक श्री. बामणीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
‘मैत्र आणि आदर जपणारी सुहास्यवदना शिक्षिका’
प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांच्या प्रास्ताविकातून सौ. कशाळीकर यांच्या आपुलकी, स्नेह, शिस्त, संयम, वेळेचे नियोजन, समर्पण आणि सेवावृत्ती या गुणांचा गौरव करण्यात आला. प्रा. महाश्वेता कुबल यांनी त्यांचा उल्लेख “मैत्र आणि आदर जपणारी सुहास्यवदना शिक्षिका” असा केला, तर प्रा. ज्योती सावंत यांनी त्यांच्या सोज्वळ, प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावाच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
“हा निवृत्ती सोहळा नव्हे, तर सन्मान सोहळा!”
सत्कारमूर्ती सौ. संप्रवी कशाळीकर यांनी आपल्या मनोगतात “आजचा दिवस निवृत्तीचा नसून सन्मानाचा आहे,” अशी भावना व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत अध्यक्ष मा. विकासभाई सावंत, दिवंगत माजी सचिव मा. सोनू सावंत तसेच विद्यमान सचिव गुरुवर्य व्ही. बी. नाईक यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात मिळालेल्या प्रेमाचा उल्लेख करताना त्या भावुक झाल्या. “तुम्ही सर्वजण, माझे विद्यार्थी आणि माझे स्नेही हीच माझ्या नावावर जमा झालेली खरी प्रॉपर्टी आहे,” या त्यांच्या भावस्पर्शी उद्गारांनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. संपूर्ण सेवाकाळात विद्यार्थ्यांसाठी काम करता आले, याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
सन्मानपत्र, शाल-श्रीफळाने गौरव
सौ. कशाळीकर यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी, दोडामार्ग हायस्कूल, चौकुळ हायस्कूल तसेच राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य प्रा. सतीश बागवे, चौकुळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका समीक्षा दळवी, दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एन. पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे तुषार वेंगुर्लेकर, माजी मुख्याध्यापक बोडके सर, राजाराम गावडे, प्रमोद भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच हिंदी प्रचार समितीचे सदाशिव सावंत व सौ. भाईप मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक समितीच्या वतीने, तर शिक्षक पतपेढी, सावंतवाडी तसेच मुक्त विद्यापीठ शाखा, सावंतवाडीच्या वतीनेही सौ. कशाळीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूनम कोचरेकर यांनी केले.
सेवाभावाची ‘पोचपावती’; आठवणींचा ठेवा सोबत
३३ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या सौ. संप्रवी कशाळीकर यांचा हा सेवापूर्ती सोहळा म्हणजे केवळ एका शिक्षिकेचा निरोप नव्हे, तर एका मातृहृदयी गुरुच्या सेवाभावाला समाजाने दिलेली मनापासूनची दाद ठरली.
फळ्यावर उमटवलेली अक्षरे पुसली जातात; पण विद्यार्थ्यांच्या मनावर उमटवलेले संस्कार कधीच पुसले जात नाहीत. सौ. कशाळीकर यांच्या ३३ वर्षांच्या सेवायात्रेची हीच खरी कमाई असून, त्यांचा सन्मान सोहळा त्यांच्या विद्यार्थीप्रेमाची आणि सेवाभावाची जणू अक्षय पोचपावतीच ठरला.



