सावंतवाडी : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता दूतांच्या सेवेला मानवंदना देण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडीने यंदाही सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवली आहे. सावंतवाडी नगरपरिषद व हॉस्पिटलमधील तब्बल १२० कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान, शिधा वाटप आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सोमवार, ७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी ही माहिती दिली.
गोविंद चित्रमंदिरच्या हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता हा सन्मान सोहळा होणार असून, त्यापूर्वी दुपारी ठीक ३ वाजता स्वच्छता दूतांसाठी मोफत मेडिकल कॅम्पला सुरुवात होणार आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांच्या माध्यमातून डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता दूतांची मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी तसेच धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.
कष्टकऱ्यांच्या आरोग्याचीही घेतली जाणार काळजी!
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरपरिषद व हॉस्पिटलमधील स्वच्छता दूतांसह गावातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलांसाठी शिधा वाटप व मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम विशेष ठरणार आहे.
या कार्यक्रमाला निसर्गप्रेमी प्रसाद गावडे (रानमाणूस) तसेच सावंतवाडीतील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित डॉ. उमेश मसुरकर आणि डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवकांचाही होणार गौरव!
या सामाजिक उपक्रमादरम्यान शहर व समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सन्मान सोहळा न राहता सेवाभाव, सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा जागर ठरणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे सल्लागार व उद्योजक शैलेश पै, अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, खजिनदार रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले आहे.
संस्थेचे सदस्य हेलन निबरे, शामराव हळदणकर, ॲड. अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार, शरदिनी बागवे, सुजय सावंत, प्रा. प्रसाद कोदे आणि शरद पेडणेकर यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभत आहे.
“ज्यांच्या श्रमांनी शहर स्वच्छ राहते, त्यांच्या सन्मानासाठी आवर्जून उपस्थित राहा!”
शहराच्या आरोग्याचे खरे शिलेदार असलेल्या नगरपरिषद व हॉस्पिटलमधील सर्व स्वच्छता दूतांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी केले आहे.
वेळ लक्षात ठेवा :
🩺 मोफत मेडिकल कॅम्प — दुपारी ३ वाजता
🏆 सन्मान व शिधा वाटप — सायंकाळी ४ वाजता
📍 स्थळ — गोविंद चित्रमंदिर हॉल, सावंतवाडी



