सुंदरवाडीची दहीहंडी ठरली सावंतवाडीचा ‘मानबिंदू’ तर ‘Gen-Z’च्या मनात संदीप गावडे ठरले ‘भावबिंदू’! ; दहीहंडीच्या निमित्ताने उत्सवाला वैचारिक अधिष्ठान देत युवा शक्तीला राष्ट्रनिर्मितीची दिशा! ; ‘Gen-Z With Bharat’चा संदेश ठरला चर्चेचा विषय. – ‘सत्यार्थ’ विशेष संपादकीय.

✍️ रूपेश पाटील.

वाचक मित्रहो,

आजच्या काळात सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द म्हणजे ‘Gen-Z’! तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात वाढलेली ही पिढी स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी, प्रश्न विचारणारी, पारंपरिक चौकटींपलीकडे विचार करणारी आणि सहजासहजी कोणाचेही ऐकून न घेणारी म्हणून ओळखली जाते. मात्र या पिढीला समजून घेऊन, तिच्या ऊर्जेला विधायक व राष्ट्रहिताच्या दिशेने वळविण्याची गरज आहे, हे जाणणारे नेतृत्व विरळच!

याच पार्श्वभूमीवर युवा मनाचा ठाव घेणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा आणि त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्याचा ध्यास घेतलेला चेहरा म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप एकनाथ गावडे यांच्याकडे पाहावे लागेल.

      

       

‘Gen-Z’ला फक्त समजून घ्यायचे नाही, तर त्यांच्या सामर्थ्याला राष्ट्रनिर्मितीच्या प्रवाहात आणायचे! या विचारातून संदीप गावडे यांनी यंदाच्या सुंदरवाडी दहीहंडी महोत्सवाला दिलेली ‘Gen-Z With Bharat’ ही टॅगलाईन केवळ एक आकर्षक घोषणा ठरली नाही, तर संपूर्ण उत्सवाच्या वैचारिक वाटचालीची ओळख बनली.

आणि म्हणूनच शनिवारी रंगलेली सुंदरवाडी दहीहंडी ही केवळ गोविंदांच्या थरांचा आणि जल्लोषाचा उत्सव न राहता युवा ऊर्जा, संस्कृती, राष्ट्रभावना, मनोरंजन आणि विधायक विचारांचा अनोखा संगम ठरली.

दहीहंडीच्या थरांबरोबर वाढली विचारांचीही उंची!

सुंदरवाडीच्या दहीहंडीला सावंतवाडी आणि परिसरातील गावागावांतून हजारोंच्या संख्येने युवा वर्गाची उपस्थिती लाभली. उत्सव म्हटला की जल्लोष, संगीत, थरार आणि मनोरंजन आलेच; मात्र याच उत्सवाला विचारांची किनार देण्याचे काम संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून झाले.

युवा मनाचा ठाव घेण्यासाठी केवळ भाषण पुरेसे नसते, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधावा लागतो. हीच बाब हेरून ‘चला हवा येऊ द्या!’ फेम लोकप्रिय अभिनेते व विनोदवीर कुशल बद्रिके यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले.

कुशल बद्रिके यांच्या आगमनाने हास्याचे फवारे उडाले, वातावरणात उत्साहाची लहर पसरली; पण या हास्याच्या मैफलीला संदीप गावडे यांनी संघर्ष, जिद्द आणि यशाचा मंत्र जोडला.

कुशल बद्रिके यांनीही केवळ विनोद न करता थेट Gen-Zशी संवाद साधत ‘आपण ठरवलं तर काहीही करू शकतो’ या सकारात्मक ऊर्जेचा संदेश दिला. त्यांच्या संघर्षाची कहाणी, यशासाठी केलेली धडपड आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द युवा वर्गापर्यंत पोहोचली.

संदीप गावडे यांनी माईक हातात घेत कोकणची अस्मिता, संस्कृती आणि मातीशी नाळ जपत यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी युवा पिढीने कोणता दृष्टिकोन स्वीकारावा, याचे प्रभावी विवेचन केले. त्यामुळे हास्याच्या रंगात रंगलेला हा संवाद अनेक युवा मनांसाठी प्रेरणेचा क्षण ठरला.

शिवकालीन मर्दानी खेळांनी जागवला पराक्रमाचा इतिहास!

सुंदरवाडी दहीहंडी महोत्सवातील शिवकालीन मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.

तलवारींची लय, शौर्याची झेप, मावळ्यांची जिद्द आणि अंगावर रोमांच उभे करणारे कौशल्य पाहताना उपस्थितांच्या मनात छत्रपती शिवरायांचा पराक्रमी काळ जिवंत झाला.

या मर्दानी खेळांनी एक महत्त्वाचा संदेशही दिला—
लढाई केवळ बाहुबलाने जिंकता येत नाही; त्यासाठी धैर्याबरोबर संयम, बुद्धी, आत्मविश्वास आणि मनावरचा ताबा आवश्यक असतो, हाच संदेश आजच्या युवा पिढीसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

‘सबका साथ, सबका विकास’चा संदेश अन् गोविंदांच्या थरांना मिळाली सामाजिक एकतेची उंची!

दहीहंडी म्हणजे थरावर थर रचत आकाशाला गवसणी घालण्याचा उत्सव. मात्र या थरांमध्ये एक सुंदर सामाजिक संदेश दडलेला आहे – एकट्याने शिखर गाठता येत नाही, एकमेकांच्या हातात हात दिला तरच उंची गाठता येते!

याच भावनेला ‘सबका साथ, सबका विकास’च्या विचाराची जोड मिळाली.

विविध गोविंदा पथकांनी दिलेल्या सलामी आणि सादरीकरणांनी वातावरणात उत्साहाची लाट निर्माण केली. त्याचवेळी कार्यक्रमास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शनही उत्सवाला वैचारिक उंची देणारे ठरले.

प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांनी सुंदरवाडी दहीहंडीचे कौतुक करताना संदीप गावडे यांच्या विविध विधायक उपक्रमांचा गौरव केला. तर ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे भावी अध्यक्ष’ असा संदीप गावडे यांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठी निश्चितच घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

‘Gen-Z’चा आमचा गोविंदा! – संदीप गावडे यांनी जिंकली युवा मनं

या संपूर्ण महोत्सवातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण ठरला तो संदीप गावडे यांच्या मनोगताचा!

‘गोविंदा हेच आमचे खरे Gen-Z’ असे सांगत त्यांनी युवा शक्तीच्या भूमिकेवर भाष्य केले. राष्ट्राच्या विकासात आजच्या युवा पिढीची जबाबदारी काय? त्यांच्या हातातील तंत्रज्ञानाची ताकद विधायक कार्यासाठी कशी वापरता येईल? समाज आणि राष्ट्राच्या भवितव्यात युवा शक्तीचे स्थान काय? या प्रश्नांना त्यांनी आपल्या मनोगतातून स्पर्श केला.

त्यांचे भाषण केवळ भाषण नव्हते, ते युवा मनाशी साधलेले थेट संवादाचे नाते होते.

त्यांनी युवा वर्गाच्या भावविश्वाला हात घातला, त्यांच्या स्वप्नांना ओळखले आणि त्याच स्वप्नांना राष्ट्रनिर्मितीची दिशा देण्याचा संदेश दिला. त्यामुळे संदीप गावडे यांचे मनोगत संपले, तरी त्यातील विचार मात्र अनेक युवा मनांमध्ये घोळत राहिले असतील, यात शंका नाही.

उत्सवात मान-सन्मानाचीही मनमोकळी उधळण!

सुंदरवाडी दहीहंडीचा आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे ‘प्रत्येकाचा आदर आणि प्रत्येकाच्या योगदानाची दखल’ ही भावना.

ज्येष्ठ नागरिक, युवा पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, कलावंत, गोविंदा पथकांचे सदस्य तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.

विशेष म्हणजे, प्रत्येकाला व्यासपीठावर बोलावून स्वतः संदीप गावडे यांनी सन्मान केला. या कृतीतून त्यांच्या कार्यपद्धतीतील आत्मीयता, संवेदनशीलता आणि सहकाऱ्यांच्या योगदानाचा आदर अधोरेखित झाला.

उत्सव एक दिवसाचा पण विचारांची ज्योत दीर्घकाळ पेटती ठेवणारी!

संदीप गावडे यांचे कार्य केवळ एका दहीहंडीपुरते मर्यादित नाही. सिंधुदुर्गातील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने काहीतरी नवे, विधायक आणि समाजोपयोगी करण्याची धडपड त्यांच्या कार्यातून दिसून येते.

शाळांना भौतिक सुविधा आणि सोलर पॅनल उपलब्ध करून देण्यापासून ते कोकणची अस्मिता जपणाऱ्या भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती योजना’ अशा विविध उपक्रमांतून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण सक्रियता ही संदीप गावडे यांच्या वाटचालीची वेगळी बाजू म्हणावी लागेल.

सुंदरवाडी दहीहंडीचा ‘मानबिंदू’… अन् Gen-Zच्या मनातील ‘भावबिंदू’!

शेवटी प्रश्न उरतो—सुंदरवाडी दहीहंडी यंदा एवढी विशेष का ठरली?

कारण यंदा केवळ दहीहंडीचा थर उंच गेला नाही, तर विचारांचाही थर उंच गेला!

मनोरंजन झाले, पण त्याला प्रबोधनाची जोड मिळाली.
मर्दानी खेळ झाले, पण त्यातून इतिहास जागा झाला.
गोविंदांचे थर झाले, पण त्यातून एकतेचा संदेश मिळाला.
कलावंत आले, पण त्यातून संघर्षाची प्रेरणा मिळाली.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे Gen-Z आली, पण ती केवळ प्रेक्षक म्हणून परतली नाही; तर विचार घेऊन परतली!

म्हणूनच सुंदरवाडीची दहीहंडी यंदा सावंतवाडीचा मानबिंदू ठरली, तर युवा नेते संदीप गावडे हे Gen-Zच्या हृदयाचा भावबिंदू ठरले, असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.

आगामी काळातही युवा शक्तीला विधायक दिशा देणारे, कोकणच्या संस्कृतीची पताका उंचावणारे आणि सामाजिक बांधिलकीचा धागा अधिक मजबूत करणारे अनेक उपक्रम संदीप गावडे यांच्या माध्यमातून घडोत, त्यांच्या प्रयत्नांना यशाची नवी शिखरे लाभोत आणि त्यांच्या कार्यातून सिंधुदुर्गच्या युवा पिढीला नवी प्रेरणा मिळो!, हीच श्रीदेव पाटेकर आणि श्री देव उपरलकर चरणी विनम्र प्रार्थना!

✍️ रूपेश पाटील.

https://youtube.com/shorts/OIjeDHNYT-Q

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles