तिरोड्याच्या पुरातन तलावाला नवे जीवन, माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचा शुभारंभ! ; विनायक राऊत यांच्या भेटीने ग्रामस्थांमध्ये उत्साह.

✍️ दिनेश मयेकर
सावंतवाडी : तिरोडा गावाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या श्री देवी माऊली मंदिरासमोरील पुरातन तलावाच्या सुशोभीकरण आणि दुरुस्ती कामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून गावाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेल्या या तलावाला नवसंजीवनी देण्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या भावना पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत.
या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री तथा आमदार सन्माननीय प्रवीणभाई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य जलसंवर्धन विभागामार्फत सुमारे ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या माध्यमातून तलावाचे सुशोभीकरण, दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
पूर्वी या तलावातील पाणी गावकऱ्यांच्या पिण्यासाठी तसेच शेती आणि भाजीपाला लागवडीसाठी वापरले जात असे. त्यामुळे या तलावाला केवळ जलस्रोत म्हणून नव्हे तर गावाच्या जीवनवाहिनीचे स्वरूप लाभले होते. आजही अनेक ज्येष्ठ ग्रामस्थांच्या आठवणी या तलावाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे जतन आणि संवर्धन होणे ही काळाची गरज असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय विनायकजी राऊत यांनी नुकतीच भेट दिली. तलावाच्या कामाची माहिती घेत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि गावाच्या विकासासाठी अशा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी रुपेश राऊळ, बाळा गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रवीणभाई भोसले, तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, सदस्य रत्नाकर आडारकर, सदस्या विश्रांती साळगांवकर, सुचित्रा जाधव, ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब, श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्ष लक्ष्मण साळगांवकर, सचिव अनिल केरकर, सदस्य सुधाकर पेडणेकर, प्रवीण केरकर, संतोष पेडणेकर, नामदेव साळगांवकर, वामन शेणई, तिरोडा ग्रामविकास मंडळ मुंबईचे खजिनदार शरद गोडकर, पंढरीनाथ सावंत, पोलीस पाटील लवू रगजी, गंगाराम केरकर, महेश्वर केरकर, पुरुषोत्तम शेणई, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर, साबाजी मांजरेकर, ठेकेदार मच्छिंद्र तांडेल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाच्या इतिहासाशी आणि श्रद्धेशी जोडलेल्या या पुरातन तलावाचे संवर्धन होत असल्याने तिरोडा ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यात हा तलाव गावाच्या सौंदर्यात आणखी भर घालणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles