सावंतवाडी : शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि नागरिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे होणार आहे. बैठकीला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी श्री. वनमोरे (कुडाळ), सावंतवाडी विभागातील सर्व अभियंते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मे महिन्यातील तीव्र उष्णतेच्या काळात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी संबंधित विभागाकडून अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी ही बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीस शहरातील सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी अर्बनचे सभापती आनंद नेवगी आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.


