राजकारणात मोठा ट्विस्ट! – संजय राऊतांकडून मंत्री नितेश राणेंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव! ; म्हणाले – “राज्यातील उत्तम मंत्र्यांपैकी एक!”

मुंबई : राजकीय आरोप-प्रत्यारोप, जहरी टीका आणि शाब्दिक युद्धासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी एक अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते व राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मुक्तकंठाने स्तुती करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

विधान परिषदेच्या निवडणुकीतील कथित घोडेबाजारावरून भाजपवर टीकेची झोड उठवल्यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ‘बरनॉल’चे पार्सल पाठवून टोला लगावला होता. मात्र या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी आक्रमक भूमिका न घेता थेट राणेंच्या कामगिरीचे कौतुकच केले.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “मी त्यांना कोणतेही रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही. त्यांनी दिलेले गिफ्ट स्वीकारेन आणि गरजू रुग्णांना देईन. मात्र त्यांनी बरनॉल का ठेवले? ते स्वतः जखमी झाले होते का?” असा मिश्कील सवालही त्यांनी केला.

यानंतर राऊतांनी थेट नितेश राणेंच्या कामाचे कौतुक करत मोठे विधान केले. “राज्यात जे मंत्री उत्तम काम करत आहेत, त्यामध्ये नितेश राणे हे एक आहेत. मत्स्यव्यवसायासारखे महत्त्वाचे खाते ते प्रभावीपणे सांभाळत आहेत. त्यांनी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तसेच त्यांनी राणेंना सल्लाही दिला. “तुम्ही तरुण मंत्री आहात. तुमच्या कुटुंबाचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जुने संबंध आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्ता अमर नसते; ती येते आणि जाते. त्यामुळे खात्याकडे अधिक लक्ष द्या,” असेही राऊत म्हणाले.

सतत एकमेकांवर जहरी टीका करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये अचानक दिसलेला हा सौहार्दाचा सूर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून, ‘राऊतांकडून राणेंना मिळालेल्या या अनपेक्षित शाबासकीमागे नेमके काय?’ याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

राजकारणातील कट्टर विरोधकांकडून आलेल्या या कौतुकामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles