सावंतवाडीतील ३३ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा.

सावंतवाडी/ मुंबई : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, अखंड आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

सावंतवाडी मतदारसंघातील ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन हा प्रकल्प तातडीने मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

आमदार केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वीज यंत्रणेची सद्यस्थिती, पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या अडचणी तसेच वादळी वाऱ्यांमुळे आणि झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होऊन नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

३३ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत झाल्यास वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून नैसर्गिक आपत्तींचा परिणामही कमी होईल. तसेच भविष्यातील वाढती वीज मागणी लक्षात घेता ही योजना सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे आमदार केसरकर यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार केसरकर यांची मागणी सकारात्मकपणे ऐकून घेत संबंधित विभागामार्फत प्रस्तावाची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सावंतवाडी मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्या या प्रयत्नांमुळे वीज व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles