“कोकणची कैफियत” – मायभूमीच्या वेदनांना वाचा फोडणारा जनआक्रोशाचा मंच! ; मुंबईत १३ जून रोजी कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चिंतन, मंथन आणि संवाद.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : “कोकण वाचला तरच कोकणची ओळख टिकेल; आणि कोकणची ओळख टिकली तरच पुढील पिढ्यांना निसर्ग, संस्कृती आणि स्वाभिमानाचा हा अमूल्य वारसा लाभेल.”
याच भावनेतून उभा राहिलेला “कोकणची कैफियत” हा केवळ परिसंवाद नसून, कोकणच्या वेदनांना न्याय मिळवून देण्यासाठीचा एक लोकसंवाद आहे. मुंबईत येत्या १३ जून रोजी कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चिंतन, मंथन आणि संवाद घडवून आणणारा “कोकणची कैफियत” हा महत्त्वपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

कोकणच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना, पर्यावरणीय संकटांना आणि स्थानिकांच्या भवितव्याशी निगडित चिंतांना शब्द देण्यासाठी हा उपक्रम पुढे आला आहे.

कोकण ही केवळ भौगोलिक भूमी नसून लाखो लोकांच्या भावना, संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांत रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्प, मायनिंग, ग्रीन एक्सप्रेस-वे यांसारख्या वादग्रस्त योजनांमुळे कोकणच्या नैसर्गिक संपदेवर आणि स्थानिकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोजगाराच्या संधींचा अभाव, शिक्षण व आरोग्य सुविधांची कमतरता, रखडलेले महामार्ग, परप्रांतीय ट्रॉलरमुळे उद्ध्वस्त होत चाललेली पारंपरिक मासेमारी आणि शेती-पर्यटन क्षेत्रासमोरील आव्हाने यामुळे कोकणातील जनमानस अस्वस्थ झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला “कोकणची कैफियत” हा परिसंवाद केवळ चर्चा नसून कोकणवासीयांच्या मनातील वेदना, अपेक्षा आणि संघर्ष यांचे प्रतिबिंब ठरणार आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि कोकणच्या प्रश्नांशी बांधिलकी असलेले नागरिक एकत्र येऊन या विषयांवर सखोल विचारमंथन करणार आहेत.

परिसंवादात उपस्थितांना प्रश्नोत्तरांद्वारे आपली मते मांडण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम लोकसहभागातून कोकणच्या भवितव्याचा वेध घेणारा ठरणार आहे.

१३ जून २०२६, शनिवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता, दादर (पूर्व), मुंबई येथील सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे हा परिसंवाद होणार असून, कोकणच्या भविष्याची काळजी असलेल्या प्रत्येकाने या चर्चेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles