‘MNGL’चं पाप, सावंतवाडीकरांना मनस्ताप! ; खोदकाम करून रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमध्ये पाणी, नागरिकांचा जीव धोक्यात!

सावंतवाडी : शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली MNGL कंपनीने केलेल्या बेफिकीर आणि नियोजनशून्य कामकाजामुळे सावंतवाडीकरांचे हाल सुरू आहेत. शहरातील विविध भागांमध्ये खोदकाम करून रस्ते अक्षरशः उखडून ठेवण्यात आले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांसाठी ते मृत्यूचे सापळे ठरत आहेत.

दोन दिवसांपूर्वी वन विभागासमोर एस.टी. बस खड्ड्यात अडकल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता. त्यानंतरही कंपनी प्रशासनाला जाग आली नाही. आज पुन्हा जेलच्या पाठीमागील रस्त्यावर एक ऑटो रिक्षा खड्ड्यात कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ही घटना MNGL च्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकाम केल्यानंतर ते योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेले नाही. परिणामी पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार न करता सुरू असलेल्या या कामामुळे संतापाची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे, खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी असताना MNGL कंपनीकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. “काम करा, पण लोकांच्या जीवाशी खेळू नका,” अशी तीव्र प्रतिक्रिया सावंतवाडीकर व्यक्त करत आहेत.

एखादा गंभीर अपघात घडून निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन आणि कंपनीला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून खड्डे बुजवावेत आणि MNGL कंपनीला जाब विचारावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

“गॅस पाईपलाईनच्या विकासापेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा; MNGL ने केलेल्या रस्त्यांच्या विद्रूपीकरणाचा हिशोब कोण देणार?” असा प्रश्न आता सावंतवाडीकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles