सावंतवाडी : बारावी विज्ञान शाखेचा टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर करिअरच्या नव्या वाटा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, १३ जून रोजी सकाळी १० वाजता फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष सत्रामध्ये सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया, कॅप राऊंड्सचे स्वरूप, महाविद्यालय निवडीसाठी प्राधान्यक्रम भरण्याची योग्य पद्धत, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
याचबरोबर आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या अमर्याद संधी, उच्च शिक्षणाचे विविध पर्याय, संशोधन क्षेत्रातील वाटचाल आणि औषधनिर्मिती उद्योगातील रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी आवश्यक दिशा आणि आत्मविश्वास मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी ते भोसले नॉलेज सिटी दरम्यान मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून हे मार्गदर्शन सत्र पूर्णपणे विनामूल्य आहे.
फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९८२३९१६००५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.



