माजगावात १४ जूनला गुणवंतांचा भव्य गौरव सोहळा! ; जि. प. सदस्य विक्रांत सावंतांची लाभणार प्रेरणादायी उपस्थिती. ; संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्गचा पुढाकार!

  • दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा होणार सन्मान. 

सावंतवाडी : संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या व्यक्तींचा भव्य “विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६” रविवारी, १४ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सकाळी ९ वाजता माजगाव-भटवाडी येथील सिद्धिविनायक सभागृहात संपन्न होणार आहे.

सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील समाजातील दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचाही सत्कार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या यशाचे कौतुक करणे आणि भावी वाटचालीस प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण कृष्णा साळवी असतील. प्रारंभी दीपप्रज्वलन व संत गोरा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दोडामार्ग तालुका अध्यक्ष गोपाळ शेटकर करणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, प्रा. नारायण परब यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कोकण विभागातील पदाधिकारी, जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच महिला व युवक आघाडीचे पदाधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करावा, असे आवाहन संत गोरा कुंभार समाज उत्थान मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles