सावंतवाडी नगरपरिषदेला अखेर कायमस्वरूपी मुख्याधिकारी! ; आ. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश, पुढील दोन दिवसांत होणार रुजू. ;

– वेंगुर्ले नगरपरिषदेलाही मिळणार नवे मुख्याधिकारी, विकासकामांना मिळणार गती! 
सावंतवाडी :  गेली अनेक महिने रिक्त असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून पुढील दोन दिवसांत नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती शक्य झाली असल्याचे सांगितले जात आहे.
सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे प्रशासनाचा कारभार इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार स्वरूपात सोपविण्यात आला होता. त्यामुळे अनेक प्रशासकीय निर्णयांना विलंब होत होता. नागरिकांच्या विविध कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या, तसेच विकासकामांच्या अंमलबजावणीवरही त्याचा परिणाम होत होता.
नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांना विविध दाखले, परवानग्या, प्रशासकीय मंजुरी तसेच विकास योजनांशी संबंधित कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार दीपक केसरकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुढील दोन दिवसांत नवीन मुख्याधिकारी नियुक्त होऊन सावंतवाडी नगर परिषदेत रुजू होणार आहेत. त्यामुळे रखडलेली प्रशासकीय कामे मार्गी लागण्यास मदत होणार असून शहरातील विकासकामांना नव्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, सावंतवाडीप्रमाणेच वेंगुर्ले नगरपरिषदेलाही नवीन मुख्याधिकारी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे दोन्ही नगरपरिषदांमधील प्रशासन अधिक सक्षम होऊन नागरिकांच्या कामकाजात सुलभता येणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
“नगर परिषदेला सक्षम आणि कायमस्वरूपी प्रशासन मिळणे ही काळाची गरज होती. आता नवीन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे विकासकामांना वेग मिळेल आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल,” असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles