प्रेमाचा शेवट रक्तरंजित! – तरुणीचा गळा आवळून खून तर प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या! ; कोकण हादरले!

 ✍️ शशिकांत मोरे. 
रोहा/धाटाव :  रोहा तालुक्यातील निडी गावात घडलेल्या एका थरारक दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातील वादाचे भीषण रूप धारण करत २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे निडी गाव शोकसागरात बुडाले असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणीचे नाव तन्वी गणेश ताडकर (वय २०) तर आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रोहित जनार्दन पाटील (वय २७) असे आहे. सोमवारी रात्री निडी येथील एका घरात दोघेही उपस्थित असताना त्यांच्यात तीव्र वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या वादातून संतापलेल्या रोहितने नायलॉनच्या दोरीने तन्वीचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने त्याच घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित घराचे मालक लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून घराची देखभाल तन्वीच्या आईकडे होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रेमसंबंधातील वादातून हा दुर्दैवी प्रकार घडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles