स्मृतीतून समाजसेवेचा दीप प्रज्वलित!, कै. ॲड. श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. ; पराडकर कुटुंबीयांचा प्रेरणादायी उपक्रम.

सावंतवाडी : एखाद्या व्यक्तीची खरी आठवण ही केवळ स्मरणदिनापुरती मर्यादित नसते, तर तिच्या विचारांचे आणि कार्याचे संस्कार समाजात जिवंत ठेवण्यात असते. याच भावनेतून कै. ॲड. श्रीधर सावळाराम पराडकर यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पराडकर कुटुंबीयांनी स्मरणदिनाला समाजोपयोगी कार्याची जोड देत शिक्षणसेवेचा सुंदर संदेश दिला.

कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी पराडकर कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेतून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळे होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल बनते. कै. ॲड. श्रीधर पराडकर यांनी आपल्या वकिली व्यवसायात वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा जपला. त्याच सामाजिक मूल्यांचा वारसा सुधीर पराडकर यांनीही रक्तदान चळवळ, रिक्षा युनियन आणि विविध सामाजिक उपक्रमांतून पुढे नेला आहे.”

यावेळी डॉ. कविता पराडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत समाजसेवेचे भान जपण्याचा संदेश दिला. “आज मी ग्रामीण भागात डॉक्टर म्हणून सेवा देत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या करिअरसोबत समाजाप्रती असलेली जबाबदारी विसरू नये आणि समाजहितासाठी कार्यरत राहावे,” असे त्या म्हणाल्या.

सावंतवाडी नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर यांनी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याचे आवाहन केले.

  • शाळेच्या प्रगतीला आणखी एक हातभार; ५ हजार रुपयांची देणगी जाहीर!

कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळा नंबर ६ च्या उल्लेखनीय आणि यशस्वी शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत बजरंग दलाचे पर्यवेक्षक दिनेश गावडे यांनी शाळेसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक देणगी जाहीर केली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर, राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, दिनेश गावडे, डॉ. कविता पराडकर, शिवा गावडे, मुख्याध्यापक केशव जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समीक्षा खोचरे, शिक्षिका सायली लांबर तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक केशव जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. कविता पराडकर यांनी मानले.

“स्मृतींचे जतन केवळ शब्दांत नव्हे, तर समाजोपयोगी कृतीतून झाले पाहिजे,” याची प्रचिती देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles