सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये माध्यमिक शालांत तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना शिक्षण, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे नवनिर्वाचित बिशप डॉ. आग्नेलो पिनेरो, विकर जनरल फादर अँड्र्यू डिमेलो, मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, मॅनेजर फादर मिलेट डिसोजा, इंग्रजी प्रायमरीचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोंसाल्वीस, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, मराठी प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता, इंग्रजी प्रायमरीच्या पर्यवेक्षिका क्लिटा परेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेच्या संगीत चमूने सादर केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. बिशप डॉ. आग्नेलो पिनेरो यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक निलेश घाडगे यांनी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करत प्रशालेच्या शंभर टक्के निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी कु. भार्गवी अंकुश शेटवे हिचा बिशप डॉ. पिनेरो यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोपटे देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, चषक व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
बारावी विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या कु. आमना गवंडी तसेच वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त कु. एंजल फर्नांडिस यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्कारांनी उपस्थितांची दाद मिळवली.
विद्यार्थिनी जानवी विनोद छबाया हिने मनोगतातून विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले, तर एरिक फर्नांडिस याने शालेय आठवणींना उजाळा देत ध्येयपूर्तीसाठी सजग राहण्याचा संदेश दिला. दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय पालक व शिक्षकांना दिले.
मॅनेजर फादर मिलेट डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम व शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात बिशप डॉ. आग्नेलो पिनेरो यांनी शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणारी दिशा स्पष्ट केली. आत्मविश्वास, स्वयंमान्यता, आदर आणि संरक्षण या जीवनमूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत नव्या वाटचालीसाठी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. पालक प्रतिनिधी आशा केशव मुळीक यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत गुरुजनांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका असुम्पतिना माडतीस आणि शेहनीला राजगुरू यांनी केले.



