ओटवणेत भरदिवसा घरफोडी, चोरट्यांकडून १ लाखांची रोकड लंपास. ;  ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाची तपासणी.

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे-कापईवाडी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापईवाडी येथील मधुकर चंद्रकांत चव्हाण यांच्या राहत्या घरी मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी २ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. घराच्या मुख्य दरवाजाशेजारील खोलीत ठेवलेल्या पहारीचा वापर करून चोरट्यांनी मुख्य दरवाजाच्या कुलुपावर प्रहार केला आणि घरात प्रवेश मिळविला.

यानंतर घरातील कपाटाच्या लॉकरजवळ ठेवलेल्या चावीचा वापर करून लॉकर उघडण्यात आला. लॉकरमधील १ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या घरफोडी प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. लोहकरे करीत आहेत.

भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे ओटवणे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles