सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील न्यू इंग्लिश स्कूल, कलंबिस्त येथे उद्या, शुक्रवार दि. ३ जुलै २०२६ रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
हा गुणगौरव समारंभ सकाळी ११.०० वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून, या प्रसंगी विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक अभिजीत जाधव तसेच शाळेचे संस्था चालक, संचालक मंडळ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करणारा हा सोहळा परिसरातील शिक्षणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



