गरीबी, जिद्द आणि गुरुंचे संस्कार! : ज्येष्ठ पत्रकार संतोष राऊळ यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पेटवली स्वप्नांची ज्योत! ; ज्या शाळेने घडवलं, त्याच कलंबिस्त हायस्कूलच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून परतले संतोष राऊळ!

कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ उत्साहात संपन्न.

सावंतवाडी: तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या परीक्षेत आपल्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमारी माधुरी महेश राऊळ, सानवी नीलकंठ गुरव आणि कुमारी सानिका ज्ञानदेव राऊळ या प्रमुख तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान शैक्षणिक यशाचा योग्य सन्मान करून त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

या दिमाखदार सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हो ते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख अतिथी संतोष राऊळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

 

यावेळी बोलताना श्री. राऊळ भावुक झाले आणि त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मी याच शाळेत शिकलो आणि आज इथपर्यंत पोहोचलो, याचे सर्व श्रेय माझ्या शिक्षकांना आणि या शाळेला जाते,” असे सांगत त्यांनी जुन्या दिवसांची आठवण काढली. ते म्हणाले की, कधीकाळी मी विद्यार्थी असताना तुमच्यासारखाच शेवटच्या बेंचवर बसायचो. परिस्थिती गरीब होती, मात्र मनात ध्येय गाठायची जिद्द आणि चिकाटी होती. खेडेगावातील विद्यार्थी कणखर असतो आणि त्याला गरिबीची जाणीव असते. त्यामुळे आपल्या आई-वडिलांचे कष्ट लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने वाटचाल केली पाहिजे.

आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश दिला. व्यक्तिमत्व विकासासाठी थोर व्यक्तींची पुस्तके, कादंबऱ्या वाचणे गरजेचे असून अभ्यासासोबतच खेळ आणि वाचनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जडणघडणीबद्दल बोलताना त्यांनी इतिहास विषयाचे शिक्षक शशिकांत धोंड सर यांचे विशेष आभार मानले. धोंड सरांनी लावलेल्या वाचन आणि लेखनाच्या सवयीमुळेच आज आपण कोणत्याही विषयावर उत्तम प्रकारे लिहू शकतो, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या सोहळ्याला संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, संचालक शशिकांत धोंड, सूर्यकांत राजगे, वसंत सावंत, कलंबिस्त गावचे माजी सरपंच शरद नाईक, सांगली केंद्रप्रमुख अवधूत जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामचंद्र सावंत, माजी विद्यार्थी राजेश गोवेकर, जयेंद्र राऊळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles