वादळाचा घाला अन् एका क्षणात संसार उद्ध्वस्त! ; सांगेली येथील विष्णू राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळले, दोन दिवसांत मदतीचे सरपंचांचे आश्वासन.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी :  निसर्गाच्या अवकृपेने एका क्षणात आयुष्यभराच्या कष्टाने उभारलेला संसार उद्ध्वस्त झाला. सांगेली येथील टेमकरवाडीमध्ये आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि प्रचंड वेगाच्या वादळाने भीषण तांडव घातले. या वादळात स्थानिक रहिवासी विष्णू सोमा राऊळ यांच्या घरावर एक विशाल फणसाचे झाड उन्मळून कोसळल्याने त्यांचे घर अक्षरशः जमीनदोस्त झाले.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेने राऊळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. झाडाच्या प्रचंड आघातामुळे घराची कौले उडून गेली, भिंती कोसळल्या आणि घरातील सर्व सामान मातीमोल झाले. अनेक वर्षांच्या कष्टाने जमवलेले फर्निचर, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धान्यही पावसाच्या पाण्यात भिजून पूर्णपणे नष्ट झाले. एका क्षणात उभा संसार उघड्यावर आल्याने कुटुंबीयांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे.
या दुर्घटनेत सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सांगेलीचे सरपंच लवू भिंगारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले.
तहसीलदार श्रीधर पाटील आणि सरपंच यांनी संयुक्तपणे नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सरपंच लवू भिंगारे यांनी राऊळ कुटुंबाला धीर देत, “शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत पुढील दोन दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनीही पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन होत आहे. निसर्गाच्या एका प्रचंड तडाख्याने एका कुटुंबाचे आयुष्यभराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले असून, आता त्यांना शासनासह समाजाच्या आधाराची नितांत गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles