सावंतवाडी : लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आश्वासनांची भाषा नव्हे, तर संकटाच्या वेळी प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेच्या पाठीशी उभे राहणे, याचा प्रत्यय सावंतवाडी तालुक्यातील नेमळे करंगुटकरवाडी (गावडेवाडी) येथे रविवारी (दि. ५) रात्री आला. वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्येची पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी तात्काळ दखल घेत मध्यरात्री स्वतः घटनास्थळी जाऊन पहाटे दोन वाजेपर्यंत उभे राहून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

नेमळे करंगुटकरवाडी (गावडेवाडी) येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. शुभांगी रेडकर यांनी रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास या भागात वारंवार खंडित होत असलेल्या वीज समस्येबाबत उपसभापती गौरव मुळीक यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात येताच मुळीक यांनी वेळ न दवडता संबंधित महावितरणच्या वायरमनला बोलावून घेतले आणि स्वतःही त्या भागातील वीज लाईनची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
रात्रीच्या अंधारात संपूर्ण लाईनची तपासणी करत बिघाड नेमका कुठे आहे, याचा शोध घेण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उपसभापती गौरव मुळीक हे पहाटे दोन वाजेपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून उभे राहिले. अखेर अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला.
लोकप्रतिनिधीने मध्यरात्री प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून समस्येचे निराकरण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे नेमळे करंगुटकरवाडी (गावडेवाडी) परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्यतत्परतेचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर राहावे, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या आहेत.



