सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील धवडकी येथे सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दत्तमंदिराशेजारी असलेल्या तुकाराम पानवळकर यांच्या लोहार शाळेवर अवाढव्य ‘न्हीवाचे’ (निव्हाचे) झाड अचानक कोसळल्याने शाळेचे छप्पर अक्षरशः चक्काचूर झाले. या दुर्घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी त्यावेळी लोहार शाळेत कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

या घटनेची तीव्रता इतकी होती की, वेंगुर्ला–बेळगाव राज्य महामार्गालगत असलेले हे झाड थेट रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही क्षणांतच महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने तारा तुटून रस्त्यावर पडल्या आणि संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणालाही विजेचा धक्का बसला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील झाड व फांद्या हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना पुन्हा एकदा पावसाळ्यात रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली असून, मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.



