वैभववाडी : “महापुरुषांचे विचार केवळ भाषणांपुरते किंवा पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि आचरणात आत्मसात करणे हीच आजच्या तरुण पिढीची खरी जबाबदारी आहे. देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर या विचारांची कास धरणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सदानंद रावराणे यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई, संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री.शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री. सत्यवान रावराणे, श्री.विजय रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे, प्राचार्य डॉ.के.आर .चव्हाण व कार्यालय अधीक्षक श्री.संजय रावराणे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते ‘वैभवराणा’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच ‘सिद्धिविनायक’ पुस्तकांचे वितरण करून विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी भेट देण्यात आली. यावेळी संस्कृती कांबळे आणि प्राची पांचाळ यांनी राष्ट्रभक्त महाराणा प्रतापसिंह यांच्यावर तर आकांक्षा खाडे आणि संपदा जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर मनोगते व्यक्त केली.
सहसचिव श्री. विजय रावराणे यांनी आपले विचार मांडताना, महापुरुषांच्या विचारांची जाणीव प्रत्येकाला होऊन देशात एक जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले तर डॉ. आर. ए. भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.



