सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आवड निर्माण व्हावी, विज्ञान शिक्षण अधिक रंजक आणि आनंददायी व्हावे या उद्देशाने पुणे नॉलेज क्लस्टर आणि सिंधुदुर्ग तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे सोमवार, ६ जुलै रोजी ‘ChemAmaze’ या विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत ऑनलाइन व ऑफलाइन शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना सहज आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या. पाण्याच्या अवस्था (States of Water), घनता (Density), विविध pH मूल्ये यांसारख्या विषयांवरील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच प्रत्यक्ष (Hands-on) प्रयोगांद्वारे विज्ञानातील संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे, विज्ञान शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनविणे तसेच गेम-आधारित शैक्षणिक साधने विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा होता. यावेळी विद्यार्थ्यांना स्वतःही अशा प्रकारचे शैक्षणिक खेळ विकसित करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विज्ञानाविषयीची जिज्ञासा आणि नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे ही कार्यशाळा यशस्वी ठरली. कार्यशाळेत जान्हवी अग्रवाल, चिन्मय स्वामी, शितल नागपुरे आणि निहारिका गोगटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सिंधुदुर्ग तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, विज्ञान शिक्षिका फरजाना मुल्ला, साक्षी सावंत आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.



