✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा झेंडा उंचावत शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा इन्सुली क्रमांक ५ ने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सलग चौथ्या वर्षी उज्ज्वल यश संपादन करत आपल्या शैक्षणिक परंपरेला आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तसेच यंदाच्या जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत २२० गुण मिळवून ४२ वा क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी कु. दिपश्री दिपेश सावंत हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक शिक्षक सुधीर गावडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक भास्कर माजगावकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. इन्सुली येथील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ आणि पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सातत्यपूर्ण यशाचे कौतुक करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रतिभा योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमाच्या जोरावर कशी फुलू शकते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. सलग चार वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले यश हे केवळ विद्यार्थ्यांचे नसून शिक्षकांचे समर्पित प्रयत्न, पालकांचे सहकार्य आणि शाळेच्या शैक्षणिक संस्कारांचे फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या गौरव सोहळ्याला सहाय्यक शिक्षक हंसराज गवळे, इन्सुली येथील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कोठावळे, रमाकांत नाईक, शंकर पाटील, सुनील सावंत, सचिन सावंत, संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या इन्सुली जि.प. शाळा क्रमांक ५ च्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळातही अशीच उल्लेखनीय कामगिरी कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



