सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने विजेतेपद पटकावून चषकावर नाव कोरले. बाळकृष्णने स्पर्धेत निर्विवाद यश मिळवून जिल्ह्यातील अव्वल स्थान कायम राखलं. मुक्ताई ॲकेडमीच्या अठ्ठावीस विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ॲकेडमीच्या सहा वर्षापासून पुढील विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व ठेवले. स्पर्धेतील एकूण अठरा पारितोषिकांमधील नऊ पारितोषिके ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी मिळवली.
स्पर्धा मुख्य गट, सोळा वर्षाखालील आणि अकरा वर्षाखालील गट अशा तीन गटांमध्ये खेळविण्यात आली. मुख्य गटात पुरुषांचे तीन व महिलांचे तीन, सोळा व अकरा वर्षाखालील गटांमध्ये मुलांचे तीन व मुलींचे तीन, असे एकूण अठरा क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू मुक्ताई ॲकेडमीची सहा वर्षाची दिव्यांका नार्वेकर हीने अकरा वर्षाखालील गटात पाच राऊंड्समध्ये तीन जणांचा पराभव करुन तीन गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. सात वर्षाचा आकाश वाटवे याने अकरा वर्षाखालील गटात सहा राऊंड्समध्ये चार जणांचा पराभव करुन चार गुण मिळवले.
ॲकेडमीचे पुढीलप्रमाणे विजेते
खुला गट – प्रथम बाळकृष्ण पेडणेकर
सोळा वर्षाखालील गट – मुलगे – हर्ष राऊळ दूसरा
मुली – गार्गी सावंत प्रथम, चारुल जाधव दूसरी, सलोनी चव्हाण तीसरी
अकरा वर्षाखालील गटात – मुलगे – 8 वर्षाचा विघ्नेश अंबापूरकर तिसरा
मुली – 9 वर्षाची मोहीशा जाधव प्रथम, 6 वर्षाची दिव्यांका तिसरी
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश संपादन केले. सर्व स्तरातून यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.



