सावंतवाडी: वेंगुर्ला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह सद्गुरू श्री मियांसाहेब यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सावंतवाडी येथील सद्गुरू श्री मियांसाहेब यांच्या समाधीस्थानाला भेट देत समाधीचे दर्शन घेतले आणि कुटुंबाच्या वतीने सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झाले.
यावेळी त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या घराण्याच्या चौथ्या पिढीपर्यंत सद्गुरू मियांसाहेबांवरील श्रद्धा कायम आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आमच्या कुटुंबाला सदैव बळ आणि प्रेरणा मिळत आली आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आम्ही सद्गुरूंच्या दर्शनानेच करतो.”
समाधीस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक भाविक, मान्यवर आणि गिरप कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी भक्तिभावाने सद्गुरूंचे दर्शन घेत प्रार्थना केली. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नगराध्यक्ष राजन गिरप यांनी सद्गुरू मियांसाहेबांविषयीची आपल्या कुटुंबाची अनेक दशकांची अखंड श्रद्धा अधोरेखित केली. त्यांनी समाधीस्थळाच्या विकासासाठीही सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
“सद्गुरू मियांसाहेबांवरील श्रद्धा ही आमच्या घराण्याचा संस्कार असून, चौथी पिढीही त्याच भक्तिभावाने सद्गुरूंच्या चरणी लीन आहे,” असे राजन गिरप यांनी सांगितले.

यावेळी प. पू. सद्गुरू मि्यांसाब भक्त मंडळाचे अध्यक्ष वसंत राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, सरचिटणीस दत्तप्रसाद अरविंददेकर, खजिनदार शैलेश पै, सहचिटणीस उमेश कोरगावकर, सदस्य सुभाष स्वार, ऋतुराज शिर्के, सदानंद पडते, साईप्रसाद हवालदार, वैभव उर्फ बंटी माठेकर, सुनील सावंत, मनोहर मसुरकर, रघुनाथ कोरगावकर, चंद्रशेखर गिरप यांसह शेकडो परमपूज्य सद्गुरु मियांसाब भक्त मंडळी उपस्थित होते



