सावंतवाडी : “आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, त्याची आवड आणि त्याच्या स्वप्नांचा आदर करणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मुलांना केवळ पुस्तकी किडा बनविण्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. विद्यार्थ्यांनीही स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्यानुसार वाटचाल करावी. आभासी (व्हर्च्युअल) जगात रमण्यापेक्षा वास्तव जगात जगण्याचा आनंद अनुभवावा. तासन्तास सोशल मीडियावर वेळ घालवणारी तरुणाई हा आजच्या समाजासमोरील गंभीर चिंतेचा विषय असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी याबाबत अधिक सजग राहणे काळाची गरज आहे,” असे प्रेरणादायी व मौलिक विचार सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी व्यक्त केले.




शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी, विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भव्य गुणगौरव समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा प्रेरणादायी कार्यक्रम आर.पी.डी. प्रशालेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर होते. व्यासपीठावर नारायण देवकर, अमोल सावंत, सी. एल. नाईक, प्रसाद सावंत, मनोहर वेंगुर्लेकर, श्रीमती कुंदा पई, बाळासाहेब नंदीहळी, शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक समीर परब, विद्यार्थी प्रतिनिधी कुमार रूपराज तावडे तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. परी कुमावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्त्व, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि सृजनशील विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि वेळेचे योग्य नियोजन यांमुळेच विद्यार्थी भविष्यात यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
समारंभात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी, विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणारे तसेच राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तहसीलदार श्रीधर पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गुणवंतांचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणारा हा गुणगौरव सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




