सावंतवाडी : येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये जिज्ञासा संस्कृत क्लब तसेच संस्कृत संहिता-सिद्धांत विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रथम वर्ष बी.ए.एम.एस.च्या विद्यार्थिनी आर्या पाटील, प्रज्ञा पोळ, निकिता मिश्रा आणि अनार्या यांनी कविकुलगुरू महाकवी कालिदास यांच्या संस्कृत साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांच्या साहित्यिक कार्यावर भाषणे सादर करत संस्कृत भाषेचे संवर्धन आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील तिचे अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.
यावेळी संहिता-सिद्धांत विभागप्रमुख प्रा. वैद्य बी. डी. पाटील यांनी आयुर्वेद शिक्षणामध्ये संस्कृत भाषेचे असलेले मूलभूत स्थान स्पष्ट केले. संस्कृत ही आयुर्वेद अध्ययनाची आधारभूत भाषा असून प्रत्येक आयुर्वेद विद्यार्थ्यास तिचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानिमित्त संस्कृत संधि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम वर्ष बी.ए.एम.एस.च्या विद्यार्थ्यांचे दहा गट करून अत्यंत चुरशीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. वैद्य राजेशकुमार सवई (शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड) यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. वैद्या मुग्धा ठाकरे व प्रा. वैद्या भारती घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन प्रा. वैद्या शीतल पाटील (सचिव, जिज्ञासा संस्कृत क्लब) यांनी केले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि भारतीय ज्ञानपरंपरेविषयीची जिज्ञासा अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.



