आनंददायी शनिवार’ ठरला ज्ञान, संस्कार अन् योगाचा संगम! ; केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर यांचे इन्सुली नंबर ५ शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन.

सावंतवाडी : तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगासनांचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अत्यंत प्रभावी पद्धतीने अध्यापन केले.

योगामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे सांगत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाचनाची गोडी लावणे, शुद्ध लेखनाची सवय आणि ज्ञानार्जनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक अध्यापनामुळे विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

केंद्रप्रमुख श्री. ठाकूर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या आदर्श आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक भास्कर माजगावकर तसेच उपशिक्षक सुधीर गावडे आणि हंसराज गवळे यांनी विशेष स्वागत करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. शाळेत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles