सावंतवाडी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप (आंबोली–सांगेली) तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रांगणा सफर २०२६’ ही ऐतिहासिक दुर्गमोहीम रविवार, १९ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. इतिहास, साहस आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जिल्हाभरातील दुर्गप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी या दुर्गसफरीचे आयोजन करण्यात आले. रांगणागडाचा समृद्ध इतिहास, भव्य वास्तुशिल्प आणि निसर्गवैभव यांचा प्रत्यक्ष अनुभव दुर्गप्रेमींना मिळावा, तसेच दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने पावसाळी हंगामात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या दुर्गसफरीदरम्यान दुर्गदर्शन, दुर्गपूजन, दुर्गसंवर्धन मोहीम, आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जांभूळ, बहावा आणि वड या देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे अवघ्या पाच वर्षांच्या बालकापासून ते ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ दुर्गप्रेमींपर्यंत सर्व वयोगटातील सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४६ दुर्गप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेत इतिहास, निसर्ग आणि साहसाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.
सफरीच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले. प्रत्येक दुर्गप्रेमीला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यात आला. भविष्यातही दुर्गसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी अशाच उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.



