सुब्रतो मुखर्जी करंडकावर मिलाग्रीस हायस्कूलची मोहोर! ; १५ वर्षांखालील फुटबॉल संघाचे दैदिप्यमान अजिंक्यपद!

सावंतवाडी : फुटबॉलमधील शिस्त, जिद्द आणि सांघिक खेळाचे अप्रतिम दर्शन घडवत मिलाग्रीस हायस्कूलच्या १५ वर्षांखालील फुटबॉल संघाने प्रतिष्ठेच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल करंडक स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावावर कोरले. अंतिम सामन्यात बलाढ्य सैनिक स्कूल, आंबोली संघाचा १-० अशा निसटत्या पण रोमांचक फरकाने पराभव करत मिलाग्रीसच्या खेळाडूंनी विजेतेपदावर मोहोर उमटवली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत मिलाग्रीसच्या खेळाडूंनी आक्रमक खेळासोबतच भक्कम बचावफळीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. अखेर निर्णायक गोलच्या जोरावर संघाने स्पर्धेचे बहुमानाचे अजिंक्यपद पटकावत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

या दैदिप्यमान यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या मेहनती, चिकाटी आणि सांघिक भावनेचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी खेळाडूंना भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संघाला या यशापर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेणारे क्रीडा शिक्षक हितेश मालंडकर आणि श्रीमती शेरॉन अल्फांसो यांच्या मार्गदर्शनाचेही विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आणि नियोजनबद्ध सरावामुळेच संघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मिलाग्रीस हायस्कूलच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विजेत्या संघावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles