✍️ मोहन जाधव.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजाची पहिली तथागत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सोमवारी (दि. २० जुलै) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक कणकवली येथील संस्थेच्या कार्यालयात बिनविरोध पार पडली. यामध्ये सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजु यांची अध्यक्षपदी, तर सूर्यकांत कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
जिल्ह्यातील बौद्ध समाजाने एकत्र येत स्थापन केलेल्या या पतसंस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा ठराव गेल्या वर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानुसार संचालक मंडळाची निवडदेखील बिनविरोध झाली.
निवडून आलेल्या संचालकांमध्ये सुहास कदम, मिलिंद जाधव, मिलिंद सरपे, सूर्यकांत कदम, रमेश कदम, अरविंद वळंजु, मोहन जाधव, दिलीप जाधव, सुषमा हरकुलकर, श्रद्धा कदम आणि सिद्धार्थ कदम यांचा समावेश आहे.
सोमवारी अध्यासी अधिकारी अभिनय विचारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद वळंजु आणि उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेची आर्थिक प्रगती, सभासदांचा विश्वास आणि समाजहिताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय विचारे तसेच सर्व संचालकांचे सहकार्य लाभल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.



