सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे येथील कुंभारवाडीमध्ये एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रवीण चंद्रकांत खडपकर (वय २३, रा. कारिवडे, कुंभारवाडी) हा गोवा येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो दररोज घरून गोव्याला ये-जा करत होता.
आज सकाळी सुमारे ८.३० वाजता त्याचे आई-वडील आपल्या-आपल्या कामासाठी घराबाहेर गेले होते. प्रवीण दुपारी २ वाजता कामावर जाणार होता. मात्र, दुपारी सुमारे १ वाजता त्याची आई घरी परतल्यानंतर बेडरूममध्ये लोखंडी वाश्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रवीण दिसून आला. तिने तातडीने मदतीसाठी धावपळ केली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार दीपक शिंदे, तसेच सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.



