भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी पताका ! ; वेदिका नाईक, देवराव प्रभूची ‘नायपर’ या राष्ट्रीय संस्थेत अभिमानास्पद निवड.

सावंतवाडी: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च औषधनिर्माण शिक्षण व संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) मध्ये प्रवेश मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कॉलेजची विद्यार्थीनी वेदिका भास्कर नाईक हिची नायपर, अहमदाबाद येथे एम.एस. फार्माकोलॉजी अँड टॉक्सीकॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तसेच कॉलेजचा विद्यार्थी देवराव चिदंबर प्रभू याने नायपर, रायबरेली येथे एम.एस. – फार्मास्युटिकल ऍनालिसिस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ज्याप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रात आयआयटी आणि व्यवस्थापन क्षेत्रात आयआयएम या देशातील सर्वोच्च संस्था मानल्या जातात, त्याचप्रमाणे फार्मसी शिक्षण व संशोधन क्षेत्रात नायपर ही भारत सरकारच्या रसायन व खते मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महत्त्वाची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते. येथे जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा, आधुनिक संशोधन सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सर्वोत्तम वातावरण मिळते. या संस्थेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देश-विदेशातील आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्या, संशोधन संस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये शास्त्रज्ञ तसेच उच्च व्यवस्थापकीय पदांवर आकर्षक करिअरच्या संधी उपलब्ध होतात.

अशा प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक राष्ट्रीय संस्थेत यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांची एकाच वेळी निवड होणे ही कॉलेजसाठी अभिमानाची बाब असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण यशाची ही आणखी एक ठळक पावती आहे. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजिव देसाई, प्राचार्य डॉ. विजय जगताप तसेच प्रा. प्रणिता पवार यांनी अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles