सावंतवाडी : प्रतिपंढरी श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी महाएकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पहाटे दुग्धाभिषेक, काकड आरती, महापूजेनंतर भाविकांना विठ्ठल दर्शन खुले करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने विठ्ठल भक्तांनी उपस्थित राहत श्रींचे दर्शन घेतले.

पहाटे काकड आरती व महापूजा संपन्न झाली. पूजेचा मान शेखर धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांना मिळाला. शेकडोंच्या संख्येने विठ्ठल भक्तांनी उपस्थित राहत दर्शन घेतले. यांनंतर श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पडला. तसेच दुपारी श्री कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजन कार्यक्रम, महिला मंडळ सावंतवाडी यांचे भजन, योगेश बोरचाटे माणगाव यांचे सुश्राव्य संगीत गायन, कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन आदी विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम आज दिवसभर होणार आहेत. विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांच्या मांदियाळीत प्रतिपंढरी दुमदुमून गेली आहे.



