वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा बाजारपेठेत डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि बदलत्या हवामानामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः शिरोडा बाजारपेठ व भाजी मार्केट परिसरातील गटारांमध्ये घाण पाणी साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डेंग्यू व मलेरिया हे गंभीर स्वरूपाचे आजार असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शिरोडा ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने शिरोडा बाजारपेठ, भाजी मार्केट आणि परिसरातील गटारांची तातडीने स्वच्छता करून जंतुनाशक फवारणी तसेच फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करावी. यासोबतच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी शिरोडा बाजारपेठेतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



