सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिका विभागात गुरुपौर्णिमेचा पवित्र सण चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि संस्कारमय वातावरणात साजरा केला.
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥” या मंगल श्लोकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना अनौपचारिक शिक्षणासोबतच उत्तम संस्कार देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हिंदू संस्कृतीतील महान ऋषी, वेदांचे संकलक आणि महाभारताचे ग्रंथकार महर्षी व्यास यांच्या जीवनकार्याची माहिती चिमुकल्यांना सोप्या भाषेत देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी महर्षी व्यास यांची वेशभूषा साकारत आकर्षक नाटिका सादर केली. तसेच “गुरु ईश्वर, तात माय; गुरु विना जगी थोर काय…” ही भावस्पर्शी प्रार्थना सादर करून आपल्या पहिल्या गुरू असलेल्या आईला आणि शाळेतील गुरुजनांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.
या संस्कारमय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुरूंबद्दल आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची जाणीव अधिक दृढ झाली. संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आणि गुरुपौर्णिमेचा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला.



