सावंतवाडी : राजकारणात पदापेक्षा पक्षनिष्ठा, विकासापेक्षा जनतेचा विश्वास आणि संघर्षातून घडलेले नेतृत्व अधिक महत्त्वाचे असते. हीच ओळख निर्माण करणारे जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते संदीप गावडे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि जनतेच्या मनातील नेतृत्व असून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या कार्याचा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी काढले.

सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य तथा तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विशाल परब बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, फणसवडेसारख्या दुर्गम भागातून राजकीय प्रवासाला सुरुवात करून पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा यशस्वी टप्पा गाठणाऱ्या संदीप गावडे यांनी अनेक राजकीय आव्हानांचा समर्थपणे सामना केला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून तब्बल अडीच हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.
आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय जाण आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या बळावर तळवडेसह आंबोली परिसरात विविध विकासकामांना गती देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. ध्येयवादी, संयमी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या या युवा नेतृत्वाचा आदर्श इतर राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावा, असेही विशाल परब यांनी नमूद केले.
यानंतर भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत संदीप गावडे यांचा वाढदिवस केक कापून आणि शुभेच्छांचा वर्षाव करत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



